अहमदनगर- 'जाता पंढरीसी, सुख वाटे जिवा.. आनंदे केशवा, भेटतासी' असे म्हणत प्रत्येक वारकरी जागो-जागी मुक्काम करत पंढरीच्या वाटेवर चालत असतो. अशीच एक दिंडी पंढरपूरच्या वाटेवर असताना एक दिवस चक्क पोलीस ठाण्यात मुक्कामी राहते. गेल्या 40 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे.
वारकऱ्यांच्या सेवेत पोलिस कर्मचारी दंग नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर येथून ही पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघते. वाटेत एका दिवसाच्या मुक्कामासाठी नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात थांबते. ही परंपरा गेल्या 40 वर्षांपासून अखंड सुरू आहे. वै. पुरुषोत्तम महाराजांची दिंडीचा हा नववा मुक्काम असतो. पोलीस ठाण्यापासून तीन किलोमीटर अंतरावर एमआयडीसी पोलीस सिद्धेश्वर दिंडीच्या स्वागताला हजर राहतात.
पोलीस दिंडीतील वारकरी होऊन सन्मानाने दिंडीला पोलीस ठाण्यात घेऊन येतात. यावेळी पोलीस वसाहतीतील महिलावर्ग पालखीला पंचारतीने ओवाळताता आणि महिला वारकऱ्यांना हळदीकुंकू लावत त्यांचे स्वागत करतात. पोलीस ठाण्यात दिंडीच्या आगमनानंतरचे वातावरण पूर्ण भक्तिमय होऊन जाते. खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे वारकरी होऊन जातात. कपाळावर भागवत धर्माचा टिळा, गळ्यात टाळ घेऊन त्यांची पाऊले हरिपाठ आणि कीर्तनात दंग होऊन हरिनामाच्या गजरावर थिरकतात.
गेल्या चाळीस वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यानंतर काही नवीन कर्मचारी आले. मात्र, सिद्धेश्वराची पालखीचा एक दिवसाचा मुक्काम अजूनही या पोलीस ठाण्यात राहतो.
प्रत्येक दिंडी, पायी वारी सोहळ्यातील वारकरी विठू माऊलीच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आसुसलेला असतो. वाटेत मुक्काम करत तो पंढरपूरकडे मार्गक्रमण करतो. मात्र, काही जणांना वारीचा अनुभव इच्छा असूनही घेता येत नाही. म्हणून पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्या रूपातच विठ्ठलाला पाहण्याचा आनंद अनेकजण घेतात. हाच आनंद अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गेल्या चाळीस वर्षांपासून नित्यनियमाने घेत आहेत.