शिर्डी :साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साई बाबांचे व्दारकामाई मंदिर पुर्वीप्रमाणे रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्याचा महत्वाचा निर्णय साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने घेतल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. साई बाबांचे द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
व्दारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे रात्रभर खुले :कोरोना काळात संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वच धार्मिक तीर्थक्षेत्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा कमी होत गेला, तसे निर्बंधही शिथिल होते गेले. पुन्हा इतर मंदिरांप्रमाणे साई मंदिराचे दरवाजे देखील भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. मात्र साई बाबांचे व्दारकामाई मंदिर साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी दिवसभर खुले आणि रात्रभर बंद ठेवण्यात येत होते. यामुळे अनेक भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी साई बाबांची द्वारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे रात्रभर खुले करण्याची मागणी साई संस्थानकडे केली होती. भाविक आणि शिर्डी ग्रामस्थांच्या या मागणीकडे पाहाता साई संस्थांच्या तदर्थ समितीने आजपासून पूर्वीप्रमाणे व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.
भाविकांनी मानले संस्थानचे आभार :साईबाबांच्या समाधीच्या दर्शननंतर भाविक व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान आदी ठिकाणी प्राधान्याने दर्शनासाठी जातात. शिर्डी ग्रामस्थ साई बाबांच्या समाधी मंदिरात दर्शनाला जाण्या अगोदर द्वारकामाईचे दर्शन घेतात. त्याचबरोबर साई बाबांच्या मंदिरात होणाऱ्या चारही आरती काही भाविक व्दारकामाईत बसून करतात. साईबाबा संस्थानने आजपासून पूर्वीप्रमाणे व्दारकामाई मंदिर खुले केल्याने भाविकांसह ग्रामस्थांनी साई संस्थानचे आभार मानले आहेत.