अहमदनगर- शरद पवार जिथे लक्ष घालतात आणि जे ठरवतात ते करूनच दाखवतात हे आता राजकारणातले समीकरण यावेळी मात्र जमू शकलेले नाही. लोकसभेच्या निकालानंतर अहमदनगर, मावळ आणि माढा या सह अनेक ठिकाणी हे समोर आले आहे. अहमदनगरमधेही पवार-बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंच्या विरोधात शड्डू ठोकला होता, मात्र, 1991 ची पुनरावृत्ती काही झालीच नाही आणि राधाकृष्ण विखेंच्या पुढे राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ज्या काही मोजक्या लढती चर्चेत राहिल्या त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा चर्चेत होती. अगदी सुरुवातीपासून ते निकाल लागेपर्यंत ही जागा चर्चेत राहिली ती सुजय विखे यांच्या उमेदवारीने. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्या जागेवर मोठा प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने सुजय विखे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, वडील राधाकृष्ण विखे यांनी त्याला उघडपणे साथ दिली आणि मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विखेंनी ही जागा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून मोठ्या मताधिक्क्याने जिंकूनही दाखवली.