पुणे - २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण असल्यामुळे साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी आठ ते अकरा यावेळेत दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली.
26 डिसेंबरचा साईबाबा मंदिराचे नियोजन
दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून महाराष्ट्रासह उर्वरित भारतात मात्र, खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. या ग्रहणामुळे मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
हेही वाचा - गोव्यात ठिकठिकाणी नाताळाची जोरदार तयारी; घरे, चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई
26 डिसेंबरला सकाळी मंदिर दर्शनासाठी बंद राहिल मात्र, मंदिरात मंत्रोच्चार सुरू राहणार आहे. अकरा वाजता मंत्रोच्चार संपल्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान होईल. यानंतर मंदिरामध्ये आरती करण्यात येईल. ग्रहण काळात साईसत्यव्रत आणि अभिषेक पुजा बंद ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन बुकींग केलेल्या साईभक्तांसाठी सकाळी सात ते आठ यावेळेत अभिषेक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व साईभक्तांनी याची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले.