शिर्डी (अहमदनगर ) -डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयाच्या वसतिगृहात 400 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण इंदोरीकर महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.
रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल -
विखे पाटील महाविद्यालयाच्या वसतिगृहात 400 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये लवकरच 90 बेड हे ऑक्सिजन सुविधेसह तयार करण्यात येणार असून तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि रूग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी प्रवरा हॉस्पिटल, विखे पाटील फौंडेशन, शिर्डी संस्थानच्या रूग्णालयात एक हजार बेडची व्यवस्था करण्यात आली होती. पण वाढती रूग्णांची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण विचारात घेऊन हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.