अहमदनगर (शिर्डी) - मागील तीन महिन्यांमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसर्या लाटेत रुग्ण वाढीचा धोका मोठा असू शकतो. असा अंदाज वर्तवला जात असून, कोरोनाचे हे संकट संपले नसून नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.
'प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे'
कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या, मागील दीड वर्षापासून जगात आलेल्या कोरोना संकटामुळे सर्व नागरिक अस्वस्थ झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावी काम केले आहे. सरकारच्या आवाहनाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर होती. यामध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासली, तर सुवीधा न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले. काही शास्त्रज्ज्ञांच्या मते तिसरी लाट यापेक्षाही अधिक वेगाने वाढू शकते. तिसऱ्या लाटेमध्ये रुग्ण वाढीचा वेग हा दुसऱ्याला लाटेपेक्षा चार पटीने असू शकतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व काळामध्ये चांगला आहार, याचबरोबर लहान मुलांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना हा पूर्णपणे संपलेला नसून, प्रत्येकाने मास्कचा व सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे असेही तांबे यावेळी म्हणाल्या आहेत.
'नागरिकांनी गर्दी करणे चुकीचे'
संगमनेर हे व्यापारीदृष्ट्या मोठे शहर आहे. येथे बाहेरील तालुक्यातील नागरिक ही मोठ्या संख्येने येत असतात. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने तालुक्यात व शहरात अत्यंत चांगले काम केले आहे. शहरातील व्यापारी बंधू व छोटे मोठे व्यावसायिक यांनीही काळजी घेत शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले तर आपण कोरोनाची वाढ नक्कीच रोखू शकतो. मात्र, निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने अनेक भागांमध्ये नागरिकांची गर्दी आढळत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. गर्दी करणे टाळा, घरगुती समारंभ टाळा, विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. तसेच कोणत्याही आजाराचे लक्षणे असेल तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. आपण काळजी घेतली तर आपले कुटुंब सुरक्षित राहील, म्हणून आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहणे ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.