महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महागाईविरोधात काँग्रेसकडून एक कोटी राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात

आंतररराष्ट्रीय बाजारात भाव कमी होवूनही सरकार भाव कमी करत नाही. अशी लूट सरकार का करते आहे. याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने एकच लक्ष मोदी सरकार विरुद्ध एक कोटी स्वाक्षरी या अभियानाला आजपासून संगमनेर शहरातून सुरुवात केली आहे.

एक कोटी स्वाक्षरी
एक कोटी स्वाक्षरी

By

Published : Jul 11, 2021, 3:17 PM IST

Updated : Jul 11, 2021, 3:38 PM IST

अहमदनगर -पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने एक कोटी स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. ही भाववाढ कमी करावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले असून पेट्रोल व डिझेल दरवाढीतून केंद्र सरकार ही सामान्य जनतेची लूट करत असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात राज्यव्यापी एक कोटी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

आज संगमनेर शेतकी संघ पेट्रोल पंप येथे या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ काँग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे,निखील पापडेजा, आदिंसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यभरात 11 ते 15 जुलै दरम्यान स्वाक्षरी अभियान

यावेळी शेतकरी संघ संगमनेर यासह संपूर्ण राज्यभरात 11 ते 15 जुलै दरम्यान स्वाक्षरी अभियान राबवले जाणार असून एक कोटी सह्यांचे निवेदन करून केंद्र सरकार विरोधात राष्ट्रपती महोदयांना दिले जाणार आहे. यापूर्वीही युवक काँग्रेसने राज्यभर विविध आंदोलने केली असून सरकारने भाववाढ कमी करावी, अशी जोरदार आग्रही मागणी केली आहे.

'भाववाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला'

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना भाजपाची मंडळी सातत्याने किरकोळ दरवाढीविरोधात आंदोलन करत होती. त्यावेळेस किंमती अगदी मर्यादित होत्या. मात्र आता कच्च्या तेलांच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी असताना सुद्धा मोदी सरकारने भरमसाठ पेट्रोल-डिझेल व गॅसची दरवाढ केली आहे. या विरोधात त्यावेळेचे आंदोलन करणारे आता शब्दही बोलायला तयार नाही. या सर्व भाववाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी मोदी सरकारला सूचना केल्या आहेत. मात्र एकाधिकारशाही असलेले हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

'मोदी सरकार हे हुकूमशाही सरकार'

सत्यजित तांबे म्हणाले की, मोदी सरकार हे हुकूमशाही सरकार आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस याचा सर्वसामान्यांची संबंध असून यामुळे खरी भाववाढ झालेली आहे. याविरोधात काँग्रेसच्या वतीने देशभर आंदोलन करण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीतून 35 ते 40 टक्के लूट केंद्र सरकार करत आहे आणि याची झळ सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्राने 35, 40 टक्के टॅक्स पेट्रोल-डिझेलवर घेण्याऐवजी 18% जीएसटी लागू करावा. त्यातून नऊ टक्के राज्याला द्यावा व नऊ टक्के केंद्र सरकारकडे ठेवावा, हे सरळ धोरण असताना केंद्र सरकार मात्र आडमुठे धोरण स्वीकारत आहे. महागाईचा आगडोंब रोखण्यासाठी पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ देऊन भांडवलदारांना मोठे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. दोन कोटी नोकर्‍या, 15 लाख असे विविध आश्वासने हवेत विरली आहेत. आता महाराष्ट्रातील व देशातील तरुणांमध्ये या सरकारविरुद्ध मोठा असंतोष असून येत्या आठवडाभरात प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील शहराच्या ठिकाणी ही सह्यांची मोहीम राबवली जाणार असून एक कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले की, मोदी सरकार म्हणजे भ्रमनिरास सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचे काहीही देणे-घेणे नसून फक्त घोषणाबाजी करायची आणि खोटे बोलायचे ही त्यांची सवय आहे. या विरोधात सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे असेही ते म्हणाले.

'एक कोटी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मोदी सरकारला पाठवणार'

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच अन्य महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आजपासून राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीमेला संगमनेर शहरातून सुरुवात केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी स्वाक्षरी करून या मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून एक कोटी नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन मोदी सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

हेही वाचा -केंद्रीय सहकार मंत्रालयाचा राज्यातील सहकारावर परिणाम होईल या चर्चेत तथ्थ नाही - शरद पवार

Last Updated : Jul 11, 2021, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details