महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोते दाम्पत्याचे समाजकार्य, १८०० मुलींचे केले कन्यादान

स्वतःला मुलगी नसतानाही शिर्डीतील कोते दाम्पत्याने १८०० मुलींचे कन्यादान केले आहे.

सामुदायिक विवाह सोहळा

By

Published : May 9, 2019, 2:11 PM IST

Updated : May 12, 2019, 2:30 PM IST

अहमदनगर - स्वतःला मुलगी नसतानाही शिर्डीतील एका दाम्पत्याने १८०० मुलींचे कन्यादान केले आहे. गेल्या १८ वर्षांपासून हे दाम्पत्य दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून अनेक गरीब कुटुंबांना आधार देत आहे.

मुलीच्या बापाला आपल्या मुलीचे लग्न करायचे कसे? ही चिंता भेडसावत असते. मात्र, शिर्डीतील कैलासबापू कोते यांनी, अशा सर्व लोकांना मोलाचा आधार दिला आहे. एक नव्हे दोन नव्हे तर गेल्या अठरा वर्षांपासून आत्तापर्यंत त्यांनी १ हजार ८०० मुलींचे स्वखर्चाने शाही थाटामाटात कन्यादान केले आहे.

सामुदायिक विवाह सोहळा

कैलासबापू हे दरवर्षी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करत असतात. आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतीषबाजी, मुलीला सगळा साजश्रृंगार, संसाराला लागणारी सर्व भांडी, सोन्याच्या मंगळसूत्रासह सगळा थाटमाट हे दाम्पत्य करत असतात. स्वतःला मुलगी जरी नसली तरी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून सुमित्रा कोते १ हजार ८०० मुलींच्या आई झाल्या आहेत.

या मुलींच्या लग्नाची सर्व तयारी सुमित्रा कोते स्वतः करतात. लग्नाच्या दोन महिने अगोदरपासून त्या या लग्नाची तयारी सुरू करतात. मुलींच्या साड्या, साज श्रृंगार, संसारोपयोगी साहित्य स्वतः खरेदी करतात. अगदी आपल्या मुलीचे लग्न असल्यासारखी त्यांची धावपळ सुरू असते. कोणत्याही मुलीच्या बापाला आपल्या मुलीचे लग्न म्हणजे ओझे वाटू नये. यासाठी आम्ही दरवर्षी हा सोहळा आयोजित करत असतो, अशी माहिती कोते दाम्पत्यांनी यावेळी दिली.

यावर्षी १२ बौद्ध आणि ४३ हिंदू असे एकुण ५५ विवाह या ठिकाणी पार पडले. कैलासबापू यांनी सुरू केलेल्या या सामाजिक कार्यात शिर्डीचे ग्रामस्थही मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम नक्कीच समाजाला प्रेरणादायी आहे, असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

सध्या राज्यात दुष्काळाने थैमान घातले आहे. प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कुठून मिळणार, अशी अवस्था असताना मुलीच्या लग्नाची चिंता असलेल्या अनेक पित्यांना हा विवाह सोहळा मोलाचा आधार ठरला आहे.

Last Updated : May 12, 2019, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details