अहमदनगर - उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी आज शिर्डीत येऊन साईंच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकंरडकातील भारताच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या क्रीडा धोरणाबाबत माध्यमांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या.
यूपीचे क्रीडामंत्री चेतन चौहान साईचरणी लीन सध्या सुरू असलेल्या विश्वकंरडकात भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. भारत यंदा विश्वकरंडक नक्कीच जिंकेल, असा विश्वास क्रीडामंत्री चेतन चौहान यांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम आता पूर्वीएवढी दमदार नसून ती उपांत्यफेरीपर्यंतही पोहचू शकणार नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महेंद्रसिंह धोनी याच्या ग्लोजवरील स्टिकरवरून निर्माण झालेल्या वादाविषयी बोलताना चौहान यांनी असे स्टिकर वापरण्यावर आक्षेप घेतला. कोणत्याही स्पर्धा अटी-शर्तीने होतात, प्रत्येक क्रिकेट बोर्डाचा खेळाडुंशी करार असतो. एकाने स्टिकर लावला तर इतर खेळाडूही त्याचे अनुकरण करतील आणि हे प्रकार वाढत जातील. भारत - पाकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना सैन्यास खेळात आणणे चुकीचे आहे. कोणताही विवाद न वाढवता त्यांना खेळू द्या आणि भारत जिंकण्यासाठी प्रार्थना करा, अस आवाहन चेतन चौहान यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील खेळाडूंना सरकार चांगल प्रोत्साहन देत आहे. ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱयास ६ कोटी , रजत पदक जिंकणाऱयास ४ कोटींचे बक्षीस तर कास्य पदक विजेत्याला २ कोटीचे बक्षीस देण्यात येणार आहे. ऑलिंम्पिकमध्ये केवळ सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनाही १० लाखाचे बक्षीस सरकारकडून देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील पुरस्कार विजेत्या खेळाडूंना दरमहा २० हजार रुपये पेन्शन सुरू केल्याचे चौहान म्हणाले. तसेच सरकारी नोकरीतही उत्तर प्रदेशात खेळाडूंना दोन टक्के आरक्षण दिल्याची माहिती चौहान यांनी दिली.