अहमदनगर - आज शुक्रवारी जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिर्डी शहरातील द्वारावती भक्तनिवासा समोरील उद्यानात साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे.
शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा; साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग - maharashtra
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिर्डी शहरातील द्वारावती भक्तनिवासा समोरील उद्यानात साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे.
दररोज सकाळी योगाप्राणायन केल्याने आरोग्यास उर्जा निर्माण होते. त्याच बरोबर योगा रोज केल्याने ह्रदय आणि यकृताची क्षमता वाढीस लागते. योगा केल्याने निरोगी राहण्यास मदत होते. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शहरातील महिलांनी आणि साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ -
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.