संगमनेर (अहमदनगर) - सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातलेली आहे. ती उठविण्याची मागणी करत आंदोलने केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे संगमनेर तालुक्यात रविवारी बैलगाडी शर्यत भरविण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 47 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
47 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल -
संगमनेर तालुक्यातील दरेवाडी या गावात रविवारी बैलगाड्यांची शर्यत सुरू असल्याची माहिती घारगाव पोलिसांनी मिळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी सुरु असलेली शर्यत थांबवली आणि घटनास्थळावरून एक बोलेरो पिकअप, दोन बैलांची जोड, शर्यतीचा छकडा अशा मुद्देमालासह सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच, या प्रकरणी 47 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर, इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत यांनी दिली आहे.