अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्याने शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
बारावी परीक्षेत नापास झाल्यामुळे एकुलत्या एक मुलाची आत्महत्या
बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्याने शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली.
मंगळवारी दुपारी बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. नांदुरी येथील सौरभ लांडगे याने बारावीची परीक्षा दिली होती. तो बारावीत ४ विषयात नापास झाल्याने सौरभला ऑनलाईन निकालातून समजले. त्यावेळी नैराश्य आल्याने त्याने गावातील शेटेमळा येथील सिताराम शेटे यांच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी सौरभला शेततळ्यातून बाहेर काढून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे नांदुरी गावात शोककळा पसरली आहे. सौरभ हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.