अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसऱया टप्पा आज (शुक्रवार) पासून जिल्ह्यातील अकोले येथून सुरू होत आहे. मुख्यमंत्री हे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस जिल्ह्यात आहेत. नगरच्या शासकीय विश्रामगृह इथे त्यांचा मुक्काम असणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री सकाळी मुंबईहून विमानाने शिर्डी इथे 10 वाजता येतील. तेथून ते अकोले येथे पोहचल्यानंतर सकाळी 11 वाजता अकोले एज्युकेशन सोसायटीच्या आईटीआई कॉलेज पटांगणावर यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा -पाण्यावरून दोन भाजपशासित राज्यात वाद उकळला; गोवा सरकारची आक्रमक भूमिका
त्यानंतर संगमनेर येथे साडे 11 वाजता जाणता राजा मैदानावर महाजनादेश यात्रा पोहचेल. तेथून ते लोणीकडे प्रस्थान करणार आहेत. दुपारी 2 वाजता लोणी इथे यात्रेचे स्वागत झाल्यावर दुपारी 3 वाजता ही यात्रा राहुरी इथे पोहचणार आहे. येथे वायएमसीए मैदानावर जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेनंतर दुपारी 4 वाजता शहरातील एमआयडीसी येथील गजानन कॉलनी, सह्याद्री चौकापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो प्रारंभ होणार आहे.