अहमदनगर- अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा बनलेला आणि उत्तरेतील नेत्यांमुळे रखडलेला अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर सत्तेत असलेल्या भाजपमध्येच दुमत असल्याचे समोर येत आहे. पालकमंत्री राम शिंदे जिल्हा विभाजनावर ठाम भूमिका घेत असताना भरघोस मतांनी निवडून दिलेले खासदार सुजय विखे यांची मात्र याबाबत वेगळी भूमिका समोर आली आहे.
जिल्हा विभाजनाबाबत पालकमंत्री आग्रही; तर खासदार विखेंचा खो - south nagar
पालकमंत्री राम शिंदे जिल्हा विभाजनावर ठाम भूमिका घेत असताना भरघोस मतांनी निवडून दिलेले खासदार सुजय विखे यांची मात्र याबाबत वेगळी भूमिका समोर आली आहे.
अहमदनगरमध्ये आयोजित जिल्हा नियोजन बैठकीनंतर जिल्हा विभाजनाबाबत दक्षिण नगर जिल्ह्यातील या दोन नेत्यांनी आपली वेगवेगळी भूमिका मांडली. विभाजनाबाबत आस लावून बसलेले दक्षिणेतील नेते आणि नागरिक संभ्रमात पडले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांनी माध्यमांसमोर जिल्हा विभाजनाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून जिल्हा विभाजन झालेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मात्र, खासदार म्हणून नुकतेच निवडून आलेले सुजय विखे यांनी प्रथम पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, त्यानंतर विभाजन असे सांगत विभाजनाला खो घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. जिल्हा विभाजनात उत्तरेतील नेत्यांनी आतापर्यंत खो घातल्याची भावना दक्षिणेतील नेत्यांसह जनतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाच्याच या दोन्ही नेत्यांनी जिल्हा विभाजनाबाबत मांडलेली भूमिका परस्पर विरोधी मानली जात आहे.