अहमदनगर- 'आमदार रोहित पवार रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस या नेत्यांना ट्विटरच्या माध्यमातून सल्ले देतात. त्यांना त्यांची उंची फार वाढली आहे, असे वाटते. मात्र, ते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून स्वतःची उंची मोजतात. रोहितदादा, तुम्ही खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात ते कळेल', अशी टीका भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टिका करतानाचा व्हिडिओ. आमदार पडळकर आज (शनिवारी) सकाळी करमाळा येथून औरंगाबादकडे जात असताना मिरजगाव येथून चालले होते. त्या वेळी रस्त्यावरील प्रचंड पडलेले रस्ते आणि त्यातून कसरत करत चाललेली अवजड वाहने पाहून ते थांबले. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात असलेले खड्डे पाहून पडळकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून खराब रस्त्यावर उभे राहून त्यांनी व्हिडिओ तयार केला. तो ट्विटरवर शेअर करत आमदार पवार यांच्यावर टिका केली.
पडळकर म्हणाले, 'ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात उंच आहे, असा अभास झालेल्या रोहित पवार यांनी खांद्यावरून खाली मतदारसंघात उतरावे. मतदारसंघातील कामांवर लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते फडणवीस यांना सल्ले देत बसू नये'.
मी औरंगाबादकडे जात असताना या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यात प्रचंड खड्डे असल्याचे दिसले. मिरजगाव येथे तर खड्डेच-खड्डे आहेत. आमदार रोहित पवार रोज देशातील नेत्यांना सल्ले देतात. ते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून स्वतःची उंची मोजतात. त्यांनी खाली उतरावे, म्हणजे ते किती खुजे आहेत, ते कळेल. त्यांना साधा गावातील रस्ता करता येत नसेल, आणि देशातील नेत्यांना सल्ले देत असेल, तर उपयोग नाही. येत्या काही दिवसांत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील रस्ते आधी दुरुस्त करावे, नंतर नेत्यांना सल्ले द्यावे, अशी टीका पडळकर यांनी केली.