अकोले ( अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावातील बिरोबाच्या यात्रेत आगीचा ( Biroba Yatra Tradition Celebration Kauthewadi ) थरार बघावयास मिळतो. ही यात्रा कठ्याची यात्रा ( Kauthewadi Kathyachi Yatra Akole ) म्हणून प्रसिद्ध आहे. डोक्यावर लाल निखाऱ्याची तेवत असलेली मातीची घागर घेऊन भाविकांनी बिरोबाच्या मंदिराला फेरा मारण्याची प्रथा शेकडो वर्षापासून सुरु आहे.
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं आणि तेथील भागातील देवस्थानांची प्रथा परंपरा ही अनोखीच असते. अशीच एक प्रथा अक्षय तृतीयनंतरच्या येणाऱया पहिल्या रविवारी अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावच्या यात्रेत बघावयास मिळते. कोरोनामुळे यात्रेत दोन वर्षे खंड पडला होता. मात्र, यंदा यात्रा भरल्याने मोठी गर्दी झाली होती. त्याचसोबत कठ्यांची संख्याही 91 होती.
मध्यरात्रीपर्यंत भक्तगण फेऱ्या मारतात - कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर माठ असतो. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उघडा करून ठेवला जातो. त्यात खैराची पेटणाऱ्या झाडांची लाकड उभी केली जातात. त्यात कापूस टाकत ती बाहेरच्या बाजूने नवीन कोऱ्या कपड्याने त्याला घट्ट बांधाले जाते. त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट करुन मंदिरासमोर हे कठे ठेवले जातात. दर्शनसाठी आलेले अनेक भाविक या कठ्यांवर थोड थोड तेल टाकत राहतात. त्यानंतर साकीरवाडी गावाला मान असलेली कठी मंदिरात रात्री नऊला पोहचल्यानंतर हे कठे पेटवले जातात. हे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन 'हुई हुई'चा आवाज करत भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात.
भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार - कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून, केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस पुर्तीसाठी कठा तयार केला जातो. तसेच, आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार झालेला असतो, अशी धारणा भाविकांची आहे.