महाराष्ट्र

maharashtra

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात?

By

Published : Jul 2, 2019, 6:18 PM IST

गेल्या दोन दिवसांपूर्वी चव्हाण यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

बाळासाहेब थोरात

अहमदनगर - संगमनेरचे आमदार आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. एवढेच नाहीतर देशातही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यांचा राजीनामा अद्यापही स्विकारला नाही. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील गेल्या मे महिन्यामध्ये राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्विकारला नव्हता. गेल्या दोन दिवसांपूर्वी चव्हाण यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details