अहमदनगर :राहाता तालुक्यातील गणेश परिसराची कामधेनू असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक पार पडली. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनसेवा पॅनल तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपाचे युवक नेते विवेक कोल्हे यांचे गटाचा गणेश परिवर्तन पॅनलमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीशी व राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची झाली. कारखान्याची निवडणूक कधी नव्हे एवढी गाजली व चर्चेची ठरली. परिणामी राज्याचे राजकीय वर्तुळासह अनेकांचे या निवडणूक निकालाकडे लक्ष लागून होते. निवडणूकत विखेंचा दारुन पराभव करत कोल्हे थोरांतांचे 18 संचालक निवडुन आले. विखेचा होम ग्राउंड पराभव केल्याने एकवटलेल्या विखे विरोधकांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे.
युवा नेत्यांनी थेट विखेंनाच दिले आवाहन :निकाल लागल्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी राहाता तहसील कार्यालय ते वीरभद्र मंदिर प्रांगणापर्यंत नगर मनमाड महामार्गावर विजयी रॅली काढली. बाजार तळ येथे विजयी सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सभासद नागरिक उपस्थित होते. या सभेत विखेंपेक्षा वयाने लहान आणि राजकारणाचा अनुभव कमी असलेल्या दोन युवा नेत्यांनी थेट विखेंनाच आवाहन दिले आहे.
विखेंना शह देणारे कोल्हे कोण आहे ?विवेक बिपिन कोल्हे हे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यावर स्व.शंकरराव कोल्हे यांची 37 वर्ष सत्ता होती. मात्र नंतर कोपरगावचे विभाजन होऊन शिर्डी मतदारसंघात वेगळा झाल्यानंतर कोल्हेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तेव्हापासून पक्षांतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला. मागील विधानसभेत झालेल्या आई स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाचा वचपा विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात काढल्याचं बोललं जात आहे.
थेट विखेंनाच आव्हान : विजयी सभेच्या भाषणातुन विवेक कोल्हे यांनी कोपरगावात आम्हाला तुमची गरज नाही, अस ठनकावुन सांगीतले आहे. माझ्या आजोबांनी योगदान दिलेल्या गणेशची निवडणूक लागल्यानंतर मी भाजपाचा असुनही विखे दोन शब्द प्रेमाचे बोलले नाही. उलट येत्या विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे पाहुन घेतो, असा दम दिला. मात्र आम्हाला तुमची गरज नाही आम्हीच तुम्हाला निवडणूकीत बघुन घेवु, असे आव्हान कोपरगावचे युवा भाजपनेते विवेक कोल्हे यांनी दिले आहे.
लंकेही विखे विरोधात आक्रमक :दुसरीकडे दक्षिणेत सुजय विखे यांच्या विरोधात पारनेरचे राष्ट्रवादीचे युवा आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवनार, अशी शक्यता असल्याने लंके विरोधात विखेनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता लंकेही विखे विरोधात आक्रमक झालेत. गणेश कारखान्याचा आणि पारनेरच्या आमदारकीसोबत तसा काही संबंध नाही. मात्र विखेंच्या दहशतीच्या राजकारणा विरोधात मावळे लढत आहेत. त्यांना धुळ चारत आहेत म्हणून मी त्यांचे अभिनंदन करायला आलो, असे सांगत लंकेंनी तुम्ही परिवर्तनाच्या सुरवातीता श्रीगणेशा केला आहे. त्याचा शेवट आम्ही दक्षिणेत खासदारकीच्या निवडणुकीत करु, असा ईशारा लंकेनी विखेेना दिला आहे.
लंकेंची विखेंवर टीका :विखेंच्या दहशतीचे झाकन उडाले आता ते सापडणारच नाही. निलेश लंके बालीश असुन त्यांना पुन्हा आमदार व्हायचे नाही का ? महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ईशारा दिला होता. पाटलांच्या या ईशाऱ्याचा लंके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मी आमदार होणार की नाही हे पारनेरची जनता ठरवेल. मात्र तुमचा लाडका पुत्र खासदार होणार की नाही हे आम्हीच ठरवनार, अशी बोचरी टिका लंके यांनी यावेळी केली आहे.