अहमदनगर- काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेढवन परिसरात भ्याड हल्ला झाला आहे. श्रीकांत मापारी यांना काही युवक मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून राजकीय द्वेशातून ही मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
याबाबत संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदविण्यात आली असून यामध्ये श्रीकांत मापारी यांनी म्हटले आहे की, संगमनेरहून लोणीकडे जात असताना माझ्या मागावर असलेले व राजकीय द्वेष मनात ठेवून कायम मला धमक्या देणारे रहिमपूर येथील सचिन रघुनाथ शिंदे, रवींद्र आबाजी गाडे, सुशील रघुनाथ शिंदे व इतर दहा पंधरा जणांनी मला एकटे गाठून माझ्या वर प्राणघातक हल्ला केला. यावेळी श्रीकांत मापारी यांना जबर मारहाण झाली असल्याने त्यांना तातडीने संगमनेर येथील तांबे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.