अहमदनगर - शहरासह जिल्ह्यांत गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांचा आलेख हा चढता असून रोज सरासरी 500 रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि मनपा प्रशासनाने कडक निर्बंध करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागापूर उपनगरातील तीन ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत.
रोज सरासरी 500 रुग्ण -
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सरासरी शंभर रुग्ण कोरोनाचे आढळून येत होते. अनेकदा ही रुग्णसंख्या 60 ते 70 इतकीच होती. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ही रुग्णसंख्या 300 वर गेली होती. सध्या रोज 500 च्या आसपास कोरोना रुग्ण सापडत आहेत. सोमवारी गेल्या चोवीस तासांत 559 रुग्ण कोरोना पोजिटीव्ह निघाले आहेत. आज 235 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 77 हजार 265 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95.40 इतके आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 546 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.