अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा येथे विष्णूच्या दशावतारांपैकी मोहिनी अवताराचे जगातील एकमेव मंदिर आहे. या मोहिनीराज मंदिराच्या यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली असून महिलांनी लावलेल्या नंदादीप आणि समईच्या प्रकाशात मंदिर उजळुन निघाले आहे. दरम्यान, ही यात्रा १५ दिवस चालणार आहे.
मोहिनीराज मंदिर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचलेल्या प्रवरा नदीतिरावरील नेवासा शहरात आहे. हे मंदिर अहिल्यादेवी होळकरांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे. हेमाडपंथी मंदिराचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरातील मूर्तीचे अर्धे शरीर पुरुषाचे व अर्धे स्त्रीचे आहे.
दशावतारात एकमेव असलेल्या अवतारावर राक्षसच नव्हे, तर भगवान शंकरही भाळले होते. खंडोबा अवतारामध्ये पार्वतीने म्हाळसा मोहिनीचेच रूप घेऊन जन्म घेतला. अमृतमंथनानंतर निघालेले अमृत केवळ देवांनाच मिळावे यासाठी विष्णूने मोहिनी अवतार घेत राक्षसांना मोहिनी घातली. अशी अख्याइका आहे.
मोहिनीराज मंदिराच्या यात्रा महोत्सव प्रसंगी महिलांनी दिवे लावून केलेली सजावट.... दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाची सुरूवात रथसप्तमीपासून होते. यात दररोज भगवत कथा आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यातील संबळाच्या निनादात सादर होणारा देवीचा भळंद हा कार्यक्रम पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
रात्री विविध भक्तांनी मंदिरात लावलेल्या नंदादीप आणि समईच्या प्रकाशाने मंदिर उजळुन निघाले आहे. यात्रा काळात ५ दिवस महाप्रसादाचे आयोजन प्रथापरंपरेनुसार करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी मोहिनीराज पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी यात्रेचा गोपाळकाला होणार आहे. त्याच दिवशी रात्री १० नंतर उत्सव मूर्तीची शहरातून मिरवणूक निघणार आहे.