अहमदनगर -केंद्र सरकारने माहिती आयुक्तांबाबतच्या नियुक्ती, बदल, कार्यकाळ याबाबत असलेले अधिकार स्वतः कडे घेतल्याने सरकारवर टीकेची झोड उठली आहे. याबाबत माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
जनतेला विचारात न घेता माहिती कायद्यातील बदल अनुचित - अण्णा हजारे - अण्णा हजारे
माहिती अधिकार कायद्यातील बदलावर समाजसेवक अण्णा हजारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर नाराज झाले आहेत.
सरकारने जनतेला न विचारता असे निर्णय करू नये, असे या बाबत अण्णांनी म्हटले. एक चांगला कायदा असताना आणि जनता त्याचा विना तक्रार वापर करत असताना त्यात काही बदल करणे आणि आपल्याकडे अधिकार घेणे हे चुकीचे आहे. जनतेला याबाबत कल्पना देणे गरजेचे होते, असेही अण्णा यावेळी म्हणाले. याबाबत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून कायद्यातील बदल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत जनतेने-युवकांनी रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारला पाहिजे. जनता रस्त्यावर उतरल्यास मी सुद्धा आंदोलनात उतरेल असे सांगितले. मात्र, आपली भूमिका सरकारच्या विरोधात नसून काही चुकत असेल तर सरकारला विचारले पाहिजे, अनेक चांगल्या गोष्टीही होत असतात. राज्यात लोकायुक्त नियुक्ती होत असल्याबद्दल अण्णांनी सरकारचे कौतुकही केले.