महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अण्णा हजारेंनी तुकाराम मुंढेंसारखं न घाबरता काम करण्याचा सल्ला दिला - तहसीलदार ज्योती देवरे

एका महिला अधिकारी आपले गार्हाणे मांडताना किती हतबल झाली आणि ती आत्महत्येच्या विचारांवर आली, हे ऐकून संबंधितांना पाझर फुटला नाही, उलट क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्रास कमी होण्याऐवजी वाढला असल्याची खंत तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज सोमवारी प्रसारमध्यमांसमोर व्यक्त केली.

anna hazare meet with parner tahsildar
anna hazare meet with parner tahsildar

By

Published : Aug 23, 2021, 10:23 PM IST

Updated : Aug 23, 2021, 10:52 PM IST

अहमदनगर -पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासामुळे आत्महत्या करणार असल्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यासंदर्भात त्यांनी खुलासा करत, ती ऑडिओ क्लिप आपलीच असून तरी ती मी व्हायरल केली नव्हती, असे म्हटले आहे. तसेच एका महिला अधिकारी आपले गार्हाणे मांडताना किती हतबल झाली आणि ती आत्महत्येच्या विचारांवर आली, हे ऐकून संबंधितांना पाझर फुटला नाही, उलट क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्रास कमी होण्याऐवजी वाढला असल्याची खंत तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज सोमवारी प्रसारमध्यमांसमोर व्यक्त केली.

प्रतिक्रिया

आज राज्यभर महसूलचे आंदोलन -

अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना आज सोमवारी राज्य तहसिलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने एक निवेदन देण्यात आले. यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या. देवरे या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तर राज्य संघटनेच्या सचिव आहेत. आज राज्यभर महसूल अधिकारी यांनी काळ्याफिती लावून घटनेचा निषेध व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली.

चौकशी राज्यस्तरीय समितीकडून व्हावी -

या घटनेची चौकशी सध्या जिल्हास्तरीय समिती करत आहे. मात्र, स्थानिक स्तरावर दबावाची शक्यता असल्याने ही चौकशी राज्यस्तरीय समितीकडून व्हावी, अशी मागणी देवरे यांनी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना केली आहे. महिला आयोगानेही ही चौकशी राज्यस्तरावर करावी, अशीही ज्योती देवरे यांची मागणी आहे.

हेही वाचा -जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी महाराष्ट्रनंतर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

अण्णांबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप -

अण्णा हजारेंचे राळेगणसिद्धी हे पारनेर तालुक्यातील आहे. देवरे यांनी आपली क्लिप व्हायरल झाल्यानंतर अण्णांनी ती ऐकली आणि तातडीने आपल्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझा फोन मी मानसिक स्थिती ठीक नसल्याने बंद ठेवला असल्याने आपल्याला अण्णांनी दोन दिवस सतत संपर्क केल्याची माहिती नंतर समजली. त्यानंतर आपण अण्णांना भेटण्यास राळेगणसिद्धीला जाऊन एकूण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी अण्णांनी अधिकाऱ्यांनी काम करताना कधीही असा आत्महत्येचा विचार करायचा नसतो. प्रामाणिक आणि सचोटीने काम करताना अडथळे येतात. पण त्याला न खचता योग्य ते काम करत राहायचे, असा सल्ला दिला. आपण अनेकदा आंदोलनामुळे जेल मध्ये गेलो, तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी दबाव झुगारून काम करतात. त्यामुळे अडचणी आल्यात म्हणून घाबरू नका, प्रामाणिक काम करत रहा, असा सल्ला दिल्याची माहिती देवरे यांनी दिली. मात्र काही लोकांनी अण्णांनी मला भेटीला गेल्यावर हाकलून दिले असे खोटे व्हिडीओ व्हायरल केले. वास्तविक अण्णांबद्दल अशी खोटी माहिती पसरवणे चुकीचे आहे असे त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी समुपदेशन केले -

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मला बोलावून समुपदेशन केले. कोणत्याही दबावाला न जुमानता अधिकाऱ्यांनी काम केल्यास अडचण येत नाही. तुम्ही काम करत रहा, असे चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्या समुपदेशनाने मी मानसिक नैराश्यातून बाहेर आली आहे. त्यामुळे आपण यापुढे आत्महत्येचा विचारही करणार नाही, असे देवरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्रीनीही मार्गदर्शन केले -

आपण या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. त्यांनीही चांगले मार्गदर्शन केल्याचे ज्योती देवरे यांनी यावेळी सांगितले.

महिला आयोगाच्या अनिता पाटील पाठीशी -

आपण यापूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अनिता पाटील यांच्याकडे माझी व्यथा मांडली होती. माझी क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सतत माझ्याशी संपर्क ठेवत, मला आत्महत्येच्या विचारापासून दूर ठेवल्याची माहिती देवरे यांनी दिली.

हेही वाचा - Genome Sequencing Result : मुंबईत १८८ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ चे १२८, अल्फाचे २, केपाचे २४ रुग्ण

अहवालात फक्त काही तांत्रिक चुका -

आपल्याबद्दल असलेल्या तक्रारीच्या चौकशी अहवालात केवळ काही तांत्रिक चुका आहेत. मात्र, काही जणांनी आपण मोठा भ्रष्टाचार केला आहे. मोठी कारवाई होणार, बदली होणार अशा बातम्या पेरल्या. मी प्रशासनाला सहकार्य करत असून चुकीचे काही केले नसल्याने आता दडपण नसल्याचे सांगितले. कोविड काळात रात्र-रात्र गाव-खेड्यात फिरून काम केले. मात्र, त्याचीही चुकीची माहिती काही जणांनी पेरली, असेही देवरे यांनी सांगितले. मात्र, त्यांनी आपण कुणाचेही अद्याप नाव घेतले नसले तरी अजूनही त्रास सुरू असल्याचे त्यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता अंगुलीनिर्देश केला.

निलेश लंकेंनी घेतली अण्णांची भेट

अण्णां झाले 'सरकार' -

व्हायरल क्लिप नंतर केवळ जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात खळबळ उडाली. राज्य स्तरावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर आदींनी उडी घेत देवरे प्रकरणाची चौकशी आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी आग्रह धरत राज्यसरकरवर टीकाही केली. दुसरीकडे संशयाची सुई असलेले पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी देवरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होत असल्याने कारवाईच्या भीतीने हा प्रयत्न केला असल्याचे माध्यमांना सांगितले. यानंतर आमदार लंके यांनी राळेगणसिद्धी इथे कागदपत्रे घेऊन जात अण्णांच्या समोर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कामाची तक्रार केली. त्याचे फोटोही समाजमाध्यमात व्हायरल झाले. लागलीच दुसऱ्या दिवशी तहसीलदार देवरे यांनी अण्णांची भेट घेत आपली कैफियत मांडली. याचेही फोटो व्हायरल झाले. एकंदरीत हा विषय राज्यात गाजत असताना आणि त्याची प्रशासकीय चौकशी सुरू असताना आमदार लंके आणि देवरे यांनी अण्णांकडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा ठेवलेली दिसते आहे. दरम्यान, अण्णांनी हा विषय वयक्तिक पातळीवर असल्याने आपण त्यात लक्ष घालणार नसल्याचे आज प्रसारमध्यमांकडे स्पष्ट केले आहे. तसेच आपण देवरे यांना आत्महत्येचा विचार चुकीचा असल्याचे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण-

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आवाजातील, आपण तालुक्याचे लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, काही सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून आपण एक महिला अधिकारी असल्याने सातत्याने त्रास होत असल्याने आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिप मधील एकंदरीत आरोप हे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याबद्दल असल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. जिल्ह्या बरोबरच राज्यातही याची मोठी चर्चा सुरू झाली. यावर आमदार लंके यांनी माध्यमांना सांगताना तहसीलदार देवरे यांच्या विरुद्ध अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. त्या विभागीय आयुक्त चौकशीत सिद्ध होत असल्याने त्यामुळे होणारी कारवाई टाळण्यासाठी देवरे यांनी ऑडिओ क्लिपमधून प्रयत्न केल्याचे सांगितले होते.

हेही वाचा -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात नीती आयोगाने राज्याला कोणताही इशारा दिला नाही - राजेश टोपे

Last Updated : Aug 23, 2021, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details