अहमदनगर - केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर देशभरातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आठ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. स्वामिनाथन आयोग, केंद्रीय कृषी मूल्य आयोग यांच्या शिफारशी मान्य कराव्यात आदी मागण्या करत अण्णांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेही वाचा -शरद पवारांचे कृषी सुधारणां बाबतचे 'ते' पत्र व्हायरल; राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण
नाक दाबा सरकार बरोबर तोंड उघडेल -
सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरच्या शेतकरी देश बंद आंदोलनात सहभागी व्हावे आणि सरकारला जागे करावे. हा देश शेतकऱ्यांचा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकल्याच पाहिजेत, अशी मागणी अण्णांनी केली आहे.
शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन यशस्वी करा -
उद्या शांततापूर्ण वातावरणामध्ये हे आंदोलन शेतकऱ्यांनी एकजुटीने यशस्वी केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा या आंदोलनात करू नये, कारण हिंसा झाली तर सरकारला ते आंदोलन मोडीत काढता येतं, त्यामुळे कधी नव्हे ती अशी अभूतपूर्व परिस्थिती शेतकऱ्यांनी एकजुटीने दिल्लीमध्ये दाखवली असताना आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात ठिकठिकाणी सहभागी होत हे आंदोलन यशस्वी करावे, सरकारला जागे करावे आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, असेही अण्णांनी म्हटले आहे.
हेही वाचा -कृषी आंदोलन: "बेहती गंगा मे हाथ धोना" ही अनेक पक्षांची भूमिका - फडणवीस