अहमदनगर -ह.भ.प इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडिटी कायद्यासह महिलांची कीर्तनातून अवहेलना करत खिल्ली उडवली म्हणून आईपीसी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करावा,अशी मागणी आज (सोमवार) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने अहमदनगर येथे पीसीपीएनडिटी सल्लागार समितीकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी केली आहे.
इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या एका कीर्तनातून सम तारखेस स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेस स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य केले होते. त्यांनी समविषय तारखेचा संदर्भ देत मुलगा किंवा मुलगी याबाबत जाहिरात करून पीसीपीएनडिटी कायद्याचा भंग केला आहे. तसेच ते वारंवार आपल्या कीर्तनातून महिलांची अवहेलना करत असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंनिसने केली आहे.