अहमदनगर- सख्खे शेजारी आणि पक्के वैरी.. या म्हणीचा प्रत्यय नगर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय पटलावर राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने अवघा महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून पहात आला आहे. लोकसभेचा निकाल लागेपर्यंत विखे-थोरात एकाच पक्षात होते. मात्र एकमेकांवर पक्षांतर्गत कुरघोड्या करण्याची एकही संधी त्यांनी कधीच सोडली नाही.
अहमदनगर- सख्खे शेजारी..पक्के वैरी ! विखे-थोरातांचे अजब-गजब राजकारण.. - सख्खे शेजारी आणि पक्के वैरी
सख्खे शेजारी आणि पक्के वैरी.. या म्हणीचा प्रत्येय नगर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय पटलावर राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने अवघा महाराष्ट्र अनेक वर्षांपासून पाहत आहे. लोकसभेचा निकाल लागेपर्यंत विखे-थोरात एकाच पक्षात होते. मात्र एकमेकांवर पक्षांतर्गत कुरघोड्या करण्याची एकही संधी त्यांनी कधीच सोडली नाही.
आपआपले विधानसभा मतदारसंघ अभेद्य किल्ले ठेवत जिल्हा बँक असो वा जिल्हा परिषद.. प्रत्येक तालुक्यात दोघांनीही आपापले गट निर्माण करून जिल्ह्यावर आपलीच सत्ता कशी राहील याची नेहमी काळजी घेतली. राज्याच्या राजकारणात देखील वरिष्ठ पातळीवर आपले वजन ठेवून आणि प्रसंगी दबावाचे राजकारण करून मंत्रीपदे शाबूत ठेवण्यात विखे-थोरातांच्या असणारा वकुब पाहता त्यांचा कोणी हात धरला नाही. लोणी आणि जोर्वे असे अवघ्या वीस किलोमीटर वर राज्यातील दोन दिग्गज मंत्री वास्तव्यास असलेले अनेक वर्षे महाराष्ट्राने पाहिले.. मात्र आता काळाच्या ओघात दुसऱ्यांदा परिस्थिती बदलली आहे. यापूर्वी 1995 च्या दरम्यान युतीच्या काळात आणि आता पुन्हा एकदा फडणवीस सरकारच्या काळात विखे परिवार साग्रसंगीत काँग्रेस पक्षाच्या बाहेर आला आहे. असे बोलले जाते की सत्तेची साथ आणि आस विखे परिवाराला सुटत नाही. त्यांच्या कृतीतूनच ती दिसून येत असते. दुसरीकडे बाळासाहेब थोरात पण काही कमी नाही. सत्ता नसली तरी पक्षातील मोठी पद आणि वर्चस्व राखण्यात ते पण यशस्वी राहिले आहेत..
विखें परिवारात सध्या मंत्रिपद, खासदारकी आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशी राजसत्ता आहे.. तर थोरातांकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद चालून आले आहे. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद भाचे सत्यजित तांबे यांच्याकडे, विधान परिषदेची आमदारकी मेव्हणे सुधीर तांबे यांच्याकडे आणि संगमनेरचे नगराध्यक्ष पद बहीण दुर्गाताई तांबे यांच्याकडे आहे... थोडक्यात काय तर राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील या शेजारी-शेजारी असलेल्या दोन दिग्गज नेत्यांकडे मोठी राजकीय ताकद आहे. असे म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी !! कारण त्यातच प्रगती दडलेली असते. त्यामुळेच शिर्डी-दिल्ली विमान प्रवासात बाळासाहेब थोरात आणि खासदार सुजय विखे कोणतीही काकू न करता गुण्या-गिविंदाने दिल्लीला शेजारी-शेजारी बसून गेले.. गेले तर गेले आपली हसतमुख छबी सोयीस्कर व्हायरल करून गेले.. आता कार्यकर्त्यांनी राजकीय पटलावरील ह्या दिग्गज राजकीय संगतीला काय नाव द्यायचं आणि काय बोध घ्यायचा तो आपापल्या परीने घेतलेलाच बरा..