अहमदनगर - भाजपा सेनेची युती गेल्या ३० वर्षांपासुन आहे. मात्र, यावेळी झालेली युती ही मागच्या युती पेक्षा अधिक घट्ट असल्याचे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले. कोपरगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान, देशात महायुतीच्या सदस्यांचा आकडा किती असेल? याबाबत मात्र ते साशंक दिसून आले.
शिर्डी लोकसभेचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची कोपरगाव येथे जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी संबोधीत करताना मोदींना निवडून देण्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार लोकसभेत निवडून जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याचे उदाहरण देताना त्यांनी अटलबिहारी वाजपेयींचे सरकार केवळ एका मताने कोसळल्याचा दाखला दिला. शिवाय महायुतीला संसदेत किती जागा मिळवता येतील याबाबतही आदित्या ठाकरे साशंक वाटले. युतीचे ३०० खासदार निवडून येऊ शकतात असे सांगाताना त्यांनी युतीला कदाचीत २७२ किंवा २०० जागांवरच समाधान मानावं लागू शकते, असे संदिग्ध वक्तव्य केले. यावरून आदित्य ठाकरे स्वत: महायुतीचे सरकार बहुमतात येणार किंवा नाही याबाबत ठाम नसल्याचे जाणवले.