अहमदनगर-मित्रपक्ष भाजपने दुय्यम वागणूक देऊ नये, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) कर्जत तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात कार्यकर्त्यांनी ही भावना व्यक्त केली.
कर्जतमधील राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा मेळाव्यात बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. रासप मित्र पक्ष या नात्याने वागत आहे, मात्र जर पक्षाला कोणी कमी लेखत असेल तर मतातून आमची ताकत दाखवून देऊ, असा इशारा देण्यात आला.
हेही वाचा -रासपचे सोळावे वर्ष राष्ट्रवादीसह बारामतीसाठी धोक्याचं - पंकजा मुंडे
जिल्ह्यात 'रासप'ला किमान 3 जागा मिळाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यात पक्षाचे किमान 15 आमदार निवडून येतील, तसेच जास्तीतजास्त जागांची मागणी युतीकडे करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कर्जत तालुक्यातील रासपच्या पदाधिकाऱ्यांना भाजप आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीचा तक्रारींचा पाढा कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे वाचून दाखवला. शिंदे हे आम्हाला अपमानास्पद वागणूक देतात म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांचे काम करण्यास आम्हाला सांगू नका, असे म्हणत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी होते. मेळाव्यासाठी अहिल्यादेवी होळकर महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दौलतोडे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव धांगडे, प्रदेश सचिव नितीन धायगुडे आणि प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब रुपनवर उपस्थित होते.