अहमदनगर- महापौर-उपमहापौर पदासाठी 30 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज वाटपास सुरुवात झाली असून सोमवारी पहिल्याच दिवशी शिवसेनेने महापौरपदासाठी रोहिणी शेंंडगे यांचा अर्ज दाखल केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह सेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक अनुपस्थित होते. अहमदनगर महापालिकेत काँग्रेसला बाजूला ठेवत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून यामुळेच काँग्रेसमध्ये मोठी खदखद आहे.
काँग्रेसने उचलला महापौर-उपमहापौर पदाचा अर्ज -
अहमदनगर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी 30 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज वाटपास सुरुवात झाली असून सोमवारी पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी संजय शेंडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या शीला दीप चव्हाण यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज नेले आहेत. राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी अर्ज अद्याप घेतलेला नाही. यावेळेसचे महापौरपद हे अनुसूचित जाती-जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपकडे या प्रवर्गातील उमेदवार नाही. अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवार 29 जून रोजी दुपारी दीड पर्यंत आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर पदासाठी आणखी कोणकोण अर्ज नेणार व तो दाखल करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा -वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!
सेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी अर्ज भरताना उपस्थित-
शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार संग्राम जगताप, संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक गणेश भोसले यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
'सत्तेच्या चाव्या माझ्याकडे' -
नगरच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आले आहेत. शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर, असे मुंबई येथे दोन पक्षांमध्ये झालेल्या बैठकीत ठरले आहे. मात्र, रविवारी नगरमध्ये एका कार्यक्रमात भाजप-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. काँग्रेसला निवडणूक प्रक्रियेत बाजूला ठेवल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. तसेच भाजपाचे माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डीले यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पात भाजपकडे महापालिकेतील सत्तेच्या चाव्या असल्याचे सांगत निवडणुकीतील रंगत कायम ठेवली आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.