शिर्डी (अहमदनगर) - येथील विमानतळासाठी जमीन दिलेल्या 21 प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला महाराष्ट्र विमानतळ प्राधिकारणाने सुरक्षा रक्षक म्हणून काम दिले होते. मात्र, आता त्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता आवशक्यता नसल्याचे कळवले आहे. इतकेच नाही तर त्यांना मागील सात महिन्यांपासून वेतनही देण्यात आले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शिर्डी विमानतळासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी गावातील सुमारे 350 एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्यात काही शेतकरी भुमिहिनही झाले. जमीन अधिग्रहणावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुबियांच्या एका वक्तीला पात्रतेनुसार नोकरीसाठी घेण्याचे अश्वासन देण्यात आले होते. विमानतळाच्या उभारणीपासून येथील 21 लोकांना सुरक्षा रक्षक म्हणून घेण्यात आले होते. मागील दहा वर्षांपासून ते सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. मात्र, आता टाळेबंदी संपताच या 21 लोकांची गरज नसल्याने त्यांना कामावरुन अचानक कमी करण्यात आले आहे. या लोकांचे गेल्या सात महिन्याचे वेतनही दिले नसल्याने या युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुबियांना महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून दिलेल्या अश्वसनाचा विसर पडला की काय, असा प्रश्न हे लोक विचारत आहेत.