अहमदनगर- कोपरगाव शहरातील सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या मुलीने ११ एकर छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरुन उतरतानाची रांगोळी काढली आहे. सौंदर्या बनसोड असे या मुलीचे नाव आहे. ड्रोनच्या सहाय्याने या रांगोळीचे चित्रण करण्यात आले आहे.
१२ वर्षाच्या मुलीने काढली ११ एकरमध्ये शिवाजी महाराजांची रांगोळी - Shivaji Maharaj
कोपरगाव शहरातील सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या मुलीने ११ एकर छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरून उतारतानाची रांगोळी काढली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमाजवळील फुलपगार फार्म येथे ही महाकाय रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीमुळे शिवजयंतीच्या दिवशी चिमुकली सौंदर्या विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे. यासाठी सौंदर्याचे आई-वडिलांनी तिला मदत केली आहे. सर्वसामान्य परिस्थिती असतानाही सुमारे २० लाख रुपये खर्चून ही रांगोळी साकारली आहे. मुलीचे जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचे स्वप्न साकारण्यासाठी वडिलांनी कर्ज काढले आहे. तर, आईने दागिने विकले आहेत. मुलीचे ध्येय पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन आपले सर्वस्व या माता-पित्यांनी पणाला लावले आहे.
सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत २६ जानेवारीपासून दररोज जवळपास १२ तास सौंदर्या रांगोळी काढण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवरायांनी १४ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला होता. त्याच धर्तीवर सौंदर्याने जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचा ध्यास घेतला आहे. आर्थिक परिस्थिती नसतानाही तिच्या आई-वडिलांनी केलेल्या धाडसाला कोणतेच मोल नाही. शिव छत्रपतींना ही रांगोळी आजच्या खरे अभिवादन ठरणार आहे.