अहमदनगर :चोरीच्या वेगवेगळ्या घटना आपण ऐकल्या आहेत. परंतु कोपरगावात चोरीची एक अजब घटना घडली आहे. वाहने, घरातील सामान, सोने चांदीचे दागिने, या चोरीच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो, बघत असतो. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे अजब चोरीची घटना समोर आली आहे. राहत्या घराच्या समोरील पटांगनातून चक्क १२ गाढवांची चोरी झाल्याची अजब घटना समोर आली आहे.
८५ हजार किमतीचे गाढव :याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी जवळील कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथिल रहिवाशी असलेले लक्ष्मण किसन कापसे हे पारंपरिक माती व्यवसाय करतात. माती वाहण्यासाठी ते गाढवांचा वापर करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांनी आपले १४ लहान मोठे गाढव आपल्या राहत्या घरासमोर बांधून ठेवले होते. ३ ते ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने १२ लहान मोठे असे एकूण ८५ हजार किमतीचे गाढव लंपास केले आहे.
चोराविरुद्ध गुन्हा दाखल :याबाबत लक्ष्मण किसन कापसे वय ३४ वर्ष राहणार धारणगाव, ता. कोपरगाव यांनी दि. ७ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. तालुका पोलिसांनी अज्ञात गाढव चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक आंधळे करीत आहे.