अहमदनगर - नेत्याचा वाढदिवस असला की अनेक शुभेच्छा, पत्रे, हार-तुरे दिले जातात. मात्र, यंदा मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर शुभेच्छांसह मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्यात आली. त्यानुसार नेवासा येथील एका महिलेने 101 रुपयांचा निधी पाठवला. त्यासोबत एक पत्र देखील लिहीले. ते बघून मुख्यमंत्री भावूक झाले.
मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त 101 रुपयांची भेट; 'या' बहिणीच्या पत्राने भावूक झाले फडणवीस औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर कनकोरी गावातील वेदांत भागवत पवार या 5 वर्षीय बालकाला पित्ताशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात, तर आई शेतमजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना करणे शक्य नव्हते. मात्र, नातेवाईकांनी त्यांच्यापरीने मदत करून त्यावर उपचार सुरू केले. मात्र, या उपचाराचा खर्च मोठा होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी त्याच्या पालकांनी इतरांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला.
दरम्यान, अहमदनगरमधील नेवासा तालुक्यात चिंचोली येथे राहणाऱ्या वेदांतची आत्या रेणुका सुनील गोंधळी यांनी मोबाईलच्या माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवला होता. मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून या बालकाच्या उपचारासाठी तत्काळ 1 लाख 90 हजार रुपयांची मदत देऊ केली. यामुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रेन रुग्णालयात वेदांतवर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे या वेदांतला जीवनदान मिळाले.
मुख्यमंत्र्यांच्या हा संवदेनशील उपक्रम आणि तत्परतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले होते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील 101 रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवले. तसेच एक भावनिक पत्र देखील त्यांना लिहिले. ते वाचून मुख्यमंत्री भावूक झाले.
नेमके काय लिहिले पत्रात? -
'आपण माझ्या मोबाईलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातातून इतर सामान्यांसाठी घडो. यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरुपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवत आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.' वेदांच्या आत्याने लिहिलेल्या या भावनिक संदेशामुळे मुख्यमंत्री भावूक झाले होते. त्यामुळेच राज्यभरातून आलेल्या 1.75 कोटी रुपयांबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. मात्र, या 1.75 कोटी रुपयांपैकी आलेल्या 101 रुपयांनी मुख्यमंत्री अधिक भावूक झाले.