टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव झाला. बेल्जियमने हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला. या पराभवासह तमाम भारतीयांचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहेत. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये चांगला खेळ करणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या क्वार्टरमधील चूका भोवल्या आणि भारताने हा सामना गमावला. दरम्यान, भारताला कांस्य पदक जिंकण्याची आणखी एक संधी आहे.
विश्वविजेता बेल्जियम संघाला सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर लॉकी लूयपाएर्ट याने गोल करत बेल्जियमला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. तेव्हा भारताला 7व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावर भारताला गोल करण्यात अपयश आलं. यानंतर भारतीय संघाला आणखी एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर हरमनप्रीत सिंगने गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगने रिव्हर्स फटका मारून अप्रतिम मैदानी गोल करत भारताची आघाडी 2-1 अशी वाढवली.
सामन्याच्या 11व्या मिनिटाला भारताला क्वॉर्नर मिळाला. यावर गोल करून, आघाडी वाढवण्याची नामी संधी भारतीय संघाकडे होती. पण बेल्जियमच्या गोलकिपरने भारताला ही संधी साधू दिली नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी 2-1 अशी कायम होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने आक्रमक धोरण अवलंबले. तेव्हा 19व्या मिनिटाला त्यांना पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर अॅलेक्सझांडर हेंड्रीक्स याने कॉर्नरवर गोल करून बेल्जियमला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. 24व्या मिनिटाला मनदीप सिंग गोल करताना चूकला आणि भारताने आघाडी घेण्याची आणखी एक संधी गमावली.