लंडन -टेनिस हा क्रीडा प्रकारातील एक सर्वात प्रतिष्ठेचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्याच टेनिस विश्वातील सर्वात जुनी आणि सर्वात मानाची असलेली विम्बल्डन ओपनच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीला सोमवारपासून सुरू होणार असून पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच आणि डोमॅनिक थीम यांना उच्च मानांकन देण्यात आले आहे.
गतवर्षी या स्पर्धेचे जेतेपद हे सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पटकावले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ८ व्या मानांकित कोरी अॅडरनसनचा पराभव केला होता. टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जाणारा स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने आतापर्यंत विक्रमी सर्वाधिक ८ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. महिला एकेरीचा विचार केला असता नुकताच फ्रेंच ओपनचा किताब पटकावणारी ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी, गतविजेती अँजेलिक कर्बर आणि जपानची नाओमी ओसाका यांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. नुकत्याच फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीमध्ये फेडररला आपल्या कट्टर प्रतिद्वंदी स्पेनच्या राफेल नदालकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या जर्मनीतील हॅले एटीपी स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावून सर्वांना सावधानतेचा इशारा दिला होता.