नवी दिल्ली - अतिशय रंजक झालेल्या यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या राफेल नदालने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तब्बल पाच तास रंगलेल्या या सामन्यात नदालने डॅनियल मेदवेदेव याचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. यूएस ओपनचे जेतेपद पटकावण्याची ही नदालची चौथी वेळ आहे. त्यामुळे नदालच्या खात्यात आता १९ ग्रॅंडस्लॅम जेतेपदे झाली आहेत.
हेही वाचा -बियांका आंद्रेस्कू : हीच 'ती' जिने वयाच्या १९ व्या वर्षी जिंकले ग्रँडस्लॅम
अंतिम सामन्यासाठी नदालचे पारडे जड मानले जात होते. यापूर्वी, नदाल आणि मेदवेदेव एकदाच आमनेसामने आले होते. त्यावेळी नदालने मेदवेदेवचा पराभव केला होता. या सामन्यातही नदालने पहिले दोन सेट जिंकले. त्यामुळे नदाल लवकरच बाजी मारेल असे सर्वांना वाटत होते.
मात्र, मेदवेदेवने त्यानंतरच्या दोन सेटमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत पुनरागमन केले. पाचव्या सेटमध्येही मेदवेदेवने नदालला चांगली झुंज दिली, पण नदालने आपला सर्व अनुभव पणाला लावत सेट ६-४ ने खिशात घातला. मरात सॅफिननंतर मेदवेदेव हा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिलाच रशियाचा पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
या सेपर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने इटलीच्या माटो बर्टिनीला हरवत या स्पर्धेची पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली होती. ३३ वर्षीय नदालने बर्टिनीला ७-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले होते. तर, दवेदेवने उपांत्य सामन्यात बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला ७-६, ६-४, ६-३ ने हरवले होते.