मेलबर्न -सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचने कॅनडाच्या मिलोस राओनिकला ६-४, ६-३, ७-६ अशी मात दिली. हा सामना २ तास ४९ मिनिटे रंगला होता.
हेही वाचा -एक सामना...४८ षटकार...७० चौकार...८१८ धावा!
दिवंगत बास्केटबॉलपटू कोबी ब्रायनच्या नावाची जर्सी घालून जोकोविच कोर्टवर उतरला होता. सामन्यानंतर त्याने कोबीच्या आठवणींना उजाळा दिला. कोबीबद्दल प्रतिक्रिया देताना जोकोविच भावूक झाला.
जोकोविचने ८ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता गुरुवारी त्याचा सामना स्विझर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडररशी होणार आहे. पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात फेडररने आपला अनुभव पणाला लावत २८ वर्षीय टेनिस सँडग्रेनला धूळ चारली. साडेतीन तास रंगलेल्या सामन्यात फेडररने १-२ अशा पिछाडीवरून ६-३, २-६, २-६, ७-६ (१०-८), ६-३ अशी बाजी मारली. त्याने १५ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
त्यामुळे आता ५० व्यांदा फेडरर आणि जोकोविच हे दिग्गज टेनिसपटू आमने-सामने येणार आहेत. आत्तापर्यंत या दोघांमध्ये झालेल्या एकूण ४९ सामन्यांत २६ वेळा जोकोविचने विजय मिळवला आहे. तर २३ वेळा फेडरर विजयी झाला आहे.