नवी दिल्ली- महिलांमध्ये अव्वल मानली जाणारी जपानची नाओमी ओसाका हिला यूएस ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिला पराभव स्विकारावा लागला. तर, पुरुषांमध्ये स्पेनच्या राफेल नदालने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.
हेही वाचा - निवृत्ती घेतलेल्या मितालीला 'हा' क्रिकेटपटू म्हणतो, 'तू खुप..
स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिक हिने नाओमीला ७-५, ६-४ असे हरवले. दीड तास रंगलेल्या या सामन्यात बेलिंडाने नाओमीला सहज हरवले. बेलिंडाला उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या २३व्या मानांकित डॉना वेकिकशी लढत द्यावी लागणार आहे. या वर्षात बेलिंडाने नाओमीला तिसऱ्यांदा हरवले आहे.
तर, पुरुषांच्या एकेरीत नदालने मारिन चिलिचला ६-३, ३-६, ६-१, ६-२ असे हरवले. नदालला पुढील फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमन याच्याशी झुंजावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या नोवाक जोकोविचने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे नदालला विजेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
जोकोविचची माघार -
जागतिक क्रमवारीत नं.१ असणाऱ्या टेनिसपटू नोवाक जोकोविचला अमेरिकेतील यूएस ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. उपउपांत्य फेरीच्या आधीच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. हा सामना जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टेन वाँवारिका यांच्यात सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या से़टमध्ये जोकोविचला खांद्य़ाची दुखापत झाली. त्यामुळे त्याने पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला.