नवी दिल्ली - भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलने एटीपी चॅलेंजर स्पर्धेत मोठा पराक्रम केला. २२ वर्षाच्या सुमितने यंदाच्या ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले. दक्षिण अमेरिकेन क्लेवर असा पराक्रम करणारा सुमित हा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
हेही वाचा -नाणेफेकीसाठी चक्क तीन कर्णधार मैदानात, क्रिकेटमध्ये घडला विचित्र प्रकार
सातव्या सीडेड सुमितने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या फाकुंडो बॅग्निसला ६-४, ६-२ असे हरवले. हा अंतिम सामना एक तास ३७ मिनिटे रंगला होता. नुकत्याच झालेल्या बांजा लूका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुमितचा पराभव झाला होता. मात्र, यावेळी त्याने विजेतेपद पटकावले आहे.
उपांत्य फेरीत सातव्या सीडेड सुमितने चौथ्या सीडेड ब्राझीलच्या थियागो मोंटियोला ६-०, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. तर, उपांत्यपूर्व फेरीत सुमितने स्थानिक खेळाडू अर्जेंटिनाच्या फ्रांन्सिस्कोला ६-३, ४-६, ६-४ असे नमवले. मागच्या महिन्यात सुमितने खेळलेल्या त्याच्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत टेनिसचा सम्राट रॉजर फेडररला झुंजवले होते. त्याने फेडररला पहिल्या सेटमध्ये मात दिली होती.
या विजेतेपदामुळे जागतिक क्रमवारीतही सुमितला फायदा झाला आहे. १५९ व्या स्थानावरून सुमितने १३५ व्या स्थानी उडी घेतली आहे.