नवी दिल्ली - यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या समाप्तीनंतर जागतिक एकेरीच्या टेनिस क्रमवारीतील पहिल्या नऊ स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, यूएस ओपनचा विजेता ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालच्या जवळ पोहोचला आहे. सध्या नदाल ९८५० गुणांसह दुसऱ्या तर, थीम ९१२५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
थीमने रविवारी जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचा २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६(६) असा पराभव करत आपले पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले. यूएस ओपन सुरू होण्यापूर्वी थीमचे ७१३५ गुण होते. परंतू ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला १९९० गुणांचा फायदा झाला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे नदालने यूएस ओपनमध्ये भाग घेतला नव्हता. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच १०८६० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.