शांघाय (चीन) - रशियाच्या अव्वल टेनिसपटू डेनिल मेदवेदेव्हने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी अॅलेक्झँडर झ्वेरेव्हचा पराभव करत स्पर्धा जिंकली. मेदवेदेव्हने अंतिम सामन्यात अॅलेक्झँडरला संधी दिली नाही. त्याने हा सामना एकतर्फी ६-४, ६-१ अशा फरकाने जिंकला.
अंतिम सामना मेदवेदेव्हने अवघ्या १ तास १३ मिनिटात जिंकला. पहिल्या सेट ६-४ ने पराभूत झाल्यानंतर अॅलेक्झँडर दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेदवेदेव्हच्या झंझावतीसमोर अॅलेक्झँडरचा निभाव लागला नाही आणि दुसरा सेट ६-१ ने जिंकत मेदवेदेव्हने चषकावर नाव कोरले.