नवी दिल्ली Year Ender 2023 : २०२३ हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खूप चांगलं राहिलं. या वर्षात भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. भारतानं स्पर्धेत विक्रमी १०७ पदकं जिंकली, ज्यात २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय खेळाडूंची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आता वर्ष संपण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या या प्रवासाबद्दल सांगणार आहोत.
स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथं करण्यात आलं. दर ४ वर्षांनी हे खेळ आयोजित केले जातात. २०२२ मध्येच या खेळांचं आयोजन करण्यात येणार होतं, परंतु कोविड महामारीमुळे स्पर्धा होऊ शकली नाही. त्यानंतर चीननं २०२३ मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं.
कोणत्या खेळात किती भारतीय खेळाडूंचा सहभाग : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये एकूण ६५५ भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता. खेळाडूंनी बॅडमिंटन, स्क्वॉश, तिरंदाजी, कलात्मक पोहणं, बॉक्सिंग, हॉकी, सेलिंग, टेनिस, नेमबाजी, रोइंग, अश्वारोहण, नौकानयन, अॅथलेटिक्स, गोल्फ, रोलर स्केटिंग, कॅनो स्प्रिंट, कुस्ती, कबड्डी आणि क्रिकेट या खेळांमध्ये भाग घेतला.
क्रिकेटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालं :यावेळी भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच आपला पुरुष आणि महिला क्रिकेट संघ पाठवला होता. या दोन्ही संघांनी अंतिम फेरी जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार मराठमोळा ऋतुराज गायकवाड होता, तर महिला संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरनं केलं होतं.
आशियाई खेळ २०२३ शी संबंधित वाद : चीननं आशियाई खेळ २०२३ साठी अरुणाचल प्रदेशातील भारतीय खेळाडूंना व्हिसा नाकारला. चीननं व्हिसा जारी केला नाही आणि अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडू, न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मापुंग लामगु यांना विमानतळावरच थांबवलं. यामुळे हे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करू शकले नाहीत.
अश्वारोहणात पहिलं कांस्य पदक : भारतीय तुकडीनं या स्पर्धेमध्ये सर्वांनाच चकित केलं. अनुष अग्रवालाचं अश्वारोहणात पहिलं कांस्य पदक जिंकलं. तर भारतीय महिला खेळाडूंनी दुहेरी टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं. पुरुष दुहेरी १००० मीटरमध्ये अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम यांचं ऐतिहासिक कांस्यपदक आणि मिश्र ३५ किमी शर्यतीत राम बाबू आणि मंजू राणी यांनी तिसरं स्थान पटकावलं.
गोल्फमध्ये पदक जिंकलं : भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही रोलर स्केटिंग संघांनी ३००० मीटर रिले सांघिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली. भारताच्या महिला रेगु संघ आणि पुरुष ब्रिज संघानं अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदक मिळवलं. उल्लेखनीय म्हणजे, अदिती अशोकन महिलांच्या वैयक्तिक गटात रौप्य पदक मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फ पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
भारतानं कोणत्या खेळात किती पदकं जिंकली :
- नेमबाजी: एकूण पदके-22 सुवर्ण-7 रौप्य-9 कांस्य-6
- अॅथलेटिक्स:एकूण पदके-29 सुवर्ण-6 रौप्य-14 कांस्य-9
- तिरंदाजी:एकूण पदके-9 सुवर्ण-5 रौप्य-2 कांस्य-2
- स्क्वॅश: एकूण पदके-5 सुवर्ण-2 रौप्य-1 कांस्य-2
- क्रिकेट: एकूण पदके-2 सुवर्ण-2 रौप्य-0 कांस्य-0
- कबड्डी:एकूण पदके-2 सुवर्ण-2 रौप्य-0 कांस्य-0
- बॅडमिंटन:एकूण पदके-3 सुवर्ण-1 रौप्य-1 कांस्य-1
- टेनिस:एकूण पदके-2 सुवर्ण-1 रौप्य-1 कांस्य-0
- अश्वारोहण:एकूण पदके-2 सुवर्ण-1 रौप्य-0 कांस्य-1
- हॉकी:एकूण पदके-2 सुवर्ण-1 रौप्य-0 कांस्य-1
- रोइंग:एकूण पदके-5 सुवर्ण-0 रौप्य-2 कांस्य-3
- बुद्धिबळ:एकूण पदके-2 सुवर्ण-0 रौप्य-2 कांस्य-0
- कुस्ती:एकूण पदके-6 सुवर्ण-0 रौप्य-1 कांस्य-5
- बॉक्सिंग:एकूण पदके-5 सुवर्ण-0 रौप्य-1 कांस्य-4
- सेलिंग:एकूण पदके-3 सुवर्ण-0 रौप्य-1 कांस्य-2
- ब्रिज:एकूण पदके-1 सुवर्ण-0 रौप्य-1 कांस्य-0
- गोल्फ:एकूण पदके-1 सुवर्ण-0 रौप्य-1 कांस्य-0
- वुशू:एकूण पदके-1 सुवर्ण-0 रौप्य-1 कांस्य-0
- रोलर स्केटिंग:एकूण पदके-2 सुवर्ण-0 रौप्य-0 कांस्य-2
- कॅनो स्प्रिंट:एकूण पदके -1 सुवर्ण -0 रौप्य -0 कांस्य -1
- टेबल टेनिस:एकूण पदके-1 सुवर्ण-0 रौप्य-0 कांस्य-1
हे वाचलंत का :
- राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार, 'या' २ खेळाडूंना मिळाला 'खेलरत्न'