भंडारा- जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नाने दिव्यांग विशेष शाळा व कर्मशाळामधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शहरातील शिवाजी महाराज क्रीडा संकुलनात आयोजित करण्यात आली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून आमदार नरेंद्र भोंडेकर व प्रमुख पाहुण्यांनी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन केले.
यावेळी बोलताना आमदार भोंडेकर म्हणाले की, 'दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी शासनाने ९०० कोटीची आर्थिंक तरतूद केली आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी शासन कटिबध्द असून दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.'
जागतिक दिव्यांग दिन : भंडारा जिल्हा क्रीडा संकुलनात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन भंडारा जिल्ह्यात २१ दिव्यांग शाळा असून एक अंध शाळा आहे. या ठिकाणी चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी आज क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये असणारे प्रत्येक गुण दिव्यांग विद्यार्थ्यांत असून ते कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. हे या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी दाखवत आहेत.
अंध, कर्णबधिर, वेगवेगळ्या गटातील विकलांग विद्यार्थांनी धावण्याच्या, गोळा फेक अशा विविध स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. २ दिवस चालणाऱ्या या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या असून ४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण पार पडणार आहे.