नवी दिल्ली - भारताची स्टार महिला धावपटू हिमा दास दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत भाग घेणार नाही. भारतीय अॅथलेटिक महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, फुल्ल फॉर्मात असलेली हिमा दास पाठदुखीमुळे जागतिक मैदानी स्पर्धेत भाग घेणार नाही. दरम्यान दोहा येथे होत असलेल्या स्पर्धेला अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत.
बुधवारी देश, इव्हेंटनिहाय प्रवेशिका जाहीर करण्यात आली. त्यानुसार ढिंग एक्स्प्रेस नावाने परिचीत असलेली हिमा दास भारताकडून सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ४-४०० किंवा मिश्र रिलेमध्ये हिमाचा समावेश भारतीय संघात करण्यात आलेला नाही.
हेही वाचा -China Open २०१९ : पी. व्ही. सिंधूचा धक्कादायक पराभव
दरम्यान, मागील काही दिवसांपासून हिमा दासच्या सहभागाविषयी संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता त्याच्या सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमाच्याच चारशे मीटर शर्यतीत दोनदा पात्रता गाठूनही प्रथम संघात निवड न झालेल्या हरियाणाच्या अंजली देवीची प्रवेशिका महासंघाने पाठवली आहे.
हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशीप: बजरंग पुनिया, रवी कुमार यांचे ऑलिम्पिक तिकीट 'कन्फर्म'
हिमा दास हिने ज्युनिअर विश्वविजेपद, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखणीय कामगिरी केली. यामुळे भारताच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, हिमाची दुखापत चिघळल्याने ती या स्पर्धेत खेळणार नाही, यावर आज शिक्कामोर्तब झाले. तिच्या अनुपस्थितीत मिश्र रिले प्रकारात जिस्ना मॅथ्यू, पुवम्मा आणि व्ही. के. विस्मया या तीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय अॅथलेटिक महासंघाने दोहा स्पर्धसाठी २५ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. या संघात द्युती चंद आणि अंजली देवीचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता जागतिक मानांकनानुसार द्युती या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. दरम्यान, महासंघाने १६ पुरुष आणि १० महिला खेळाडूंची निवड संघात केली आहे.