अलमाटी - टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केलेल्या विनेश फोगाट (५३ किलो), युवा अंशू मलिक (५७ किलो) आणि दिव्या काकरान (७२ किलो) यांनी आज अशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आपापल्या वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. रियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेत साक्षी मलिकला (६५ किलो) मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विनेश फोगाट व अंशू मलिक या दोघींचे या स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक ठरले.
आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये चीन व जपानचे कुस्तीपटू सहभागी झाले नव्हते. मात्र विनेश फोगाट हिने या स्पर्धेकडे गांभीर्याने लक्ष दिले. तिने ५३ किलो वजनी गटात एकही गुण न गमावता सुवर्ण पदक जिंकले. विनेश फोगाट हिने फायनल लढतीत तैपेईच्या मेंग सुआन सिह हिला ६-० अशा फरकाने पराभूत करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली.
भारताची १९ वर्षीय युवा कुस्तीपटू अंशू मलिक हिने ५७ किलो वजनी गटात दैदीप्यमान कामगिरी केली. तिने मंगोलियाच्या बेतसेतसेग अलतानसेतसेग हिला ३-० अशा फरकाने हरवून आपली धमक दाखवली.