पुणे: खेलो इंडियाच्या पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत रोलबॉलचा समावेश करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Union Sports Minister Anurag Thakur ) यांनी दिले आहे. आज सकाळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्ह्याचे सचिव श्री. प्रमोद काळे,ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे उपस्थित होते.
यावेळी त्यांना पुण्यामध्ये 19 ते 22 मे दरम्यान बालेवाडी येथे होणाऱ्या अठराव्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आमंत्रण ( Invitation to 18th National Rollball Tournament ) देण्यात आले. तसेच या खेळाचा समावेश खेलो इंडिया गेम्समध्ये व्हावा. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेला दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळावी आणि राष्ट्रीय स्पर्धेला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सहकार्य मिळावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व माहिती घेतली व योग्य सहकार्याचे आश्वासन दिले.