टोकियो - भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे सुमित अंतिलने पाच वेळा विश्वविक्रम मोडत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर बोलताना सुमित अंतिलने, हे माझे बेस्ट प्रदर्शन नव्हते. मी याहून अधिक चांगली कामगिरी करून दाखवेन, असा विश्वास बोलून दाखवला.
हरियाणाच्या सोनीपतचा 23 वर्षीय सुमित अंतिलने पाचव्या प्रयत्नात 68.55 मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदक जिंकले. त्याने 62.88 मीटरचा आपलाच मागील विश्वविक्रम, पाच वेळा सुधारला.
सुमित अंतिल म्हणाला, हे माझे पहिले पॅराऑलिम्पिक होते. कठीण सामना असल्याने मी थोडासा नर्वस होतो. 70 मीटरहून अधिक लांब थ्रो जाईल, असा विचार मी करत होतो. कदाचित मी 75 मीटरचा देखील थ्रो करू शकलो असतो. ही माझी बेस्ट कामगिरी नाही. पण मी विश्वविक्रम मोडल्याने खूश आहे.
मोटारसायकल दुर्घटनेत सुमित अंतिलने आपला एक पाय गमावला आहे. तो पुढे बोलताना म्हणाला की, मी खूप चांगला कुस्तीपटू नव्हतो. माझे कुटुंब मला कुस्ती खेळताना पाहू इच्छित होते. मी वयाच्या सातव्या वर्षापासून कुस्ती खेळायला सुरूवात केली. जवळपास मी चार ते पाच वर्ष कुस्ती खेळलो. पण इतका चांगला कुस्तीपटू मी नव्हतो.