टोकियो - भारताची महिला बॉक्सर पूजा राणीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरूवात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने आज बुधवारी 75 किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड 16 मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा 5-0 ने पराभव केला.
पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 31 जुलै रोजी होणार आहे. या सामन्यात पूजा राणी तिसऱ्या मानांकित चीनच्या ली कियान हिच्याविरुद्ध रिंगमध्ये उतरेल. पूजाने दोन वेळा आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. या दरम्यान, तिने चीनच्या ली कियान हिला पराभूत केले होते. जर पूजाने ली कियान विरुद्धचा सामना जिंकला तर तिचे पदक निश्चित होईल.
पूजा राणी आणि अल्जेरियाच्या चाइब हिचे हे पहिलं ऑलिम्पिक आहे. परंतु पूजा अनूभवी खेळाडू आहे. ती अल्जेरियाच्या खेळाडूवर भारी पडली. पहिल्या राउंडममध्ये पूजाने चाइबला शानदार पंच मारले. त्यामुळे पंचांनी पहिल्या राउंडमध्ये पूजाला चांगले गुण दिले.
दुसऱ्या राउंडमध्ये पूजाने हाच धडाका कायम ठेवला. तिने सलग दोन दमदार पंच मारले. तेव्हा अल्जेरियाच्या खेळाडूने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पण पूजाने डिफेंन्सिव टेकनिक दाखवत तिचे आक्रमण परतावून लावले. दुसऱ्या राउंडमध्ये देखील पूजाची कामगिरी सरस ठरली.