टोकियो - भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं. त्याने 65 किलो वजनी गटात कझाकिस्तानचा कुस्तीपटू दौलत नियाझबीकोव याचा पराभव करत पदकाला गवसणी घातली. बजरंगने हा सामना 8-0 असा एकतर्फा जिंकला. दरम्यान, भारताचे हे सहावे पदक आहे.
बजरंग पुनियाने कास्य पदकासाठीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या कुस्तीपटूवर संपूर्ण वर्चस्व मिळवले. त्याने कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला एकही गुण घेऊ दिला नाही. त्याने पहिल्या सत्रात दोन वेळा एक-एक गुणाची कमाई करत 2-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर त्याने दुसऱ्या सत्रात 2, 2, 2 असे एकपाठोपाठ गुण घेत कझाकिस्तानच्या खेळाडूला 8-0 ने धूळ चारत कास्य पदक जिंकले.
भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील सहावे पदक
मीराबाई चानूने वेटलिंफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यानंतर पी. व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि भारतीय पुरूष हॉकी संघाने कास्य पदक जिंकलं. तर रवी कुमार दहियाने रौप्य पदकाची कमाई केली. आता बजरंग पुनियाने कास्य पदकाची यात भर घातली.
बजरंगची सुवर्ण पदकाची वाट अजरबैजानच्या कुस्तीपटूने रोखली
अजरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीयेव याने उपांत्य सामन्यात संपूर्ण वर्चस्व राखलं. त्याने पहिल्या सत्रात दोन वेळा 2-2 गुण घेत सामन्यात 4-1 ने आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात त्याने अधिक ताकतीने खेळ केला. त्याने बजरंगला पुनरागमनाची संधीच दिलीच नाही. त्याने 2, 2, 1, 2, 1 असे गुण घेतले. तर बजरंगला 2, 2 गुण घेता आले. बजरंगचा या सामन्यात 12-5 असा एकतर्फा पराभव झाला होता.