टोकियो - भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. चीनच्या ली क्यूआन हिने पूजा राणीचा 5-0ने एकतर्फा पराभव केला. या पराभवासह पूजा राणीचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
चीनच्या खेळाडूने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. तिने पहिल्या राउंडमध्ये पूजा राणीला 5-0 ने पराभूत केले. यात पाचही पंचानी चीनी खेळाडूला संपूर्ण 10-10 गुण दिले.
दुसऱ्या राउंडमध्ये देखील पूजा राणी 5-0 ने पराभूत झाली. चीनी खेळाडूला पंचांनी संपूर्ण 10-10 गुण दिले. तर पूजा राणीला चार पंचांनी 9 तर एका पंचाने 8 गुण दिले. तिसऱ्या राउंडमध्ये देखील चीनच्या खेळाडूचा बोलबाला राहिला. अखेरीस पूजा राणीचा 5-0 ने पराभव झाला.
दरम्यान, पूजा राणीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार सुरूवात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तिने 75 किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड 16 मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा 5-0 ने पराभव केला होता.